पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी
राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
अकोला जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी वेब संवाद
अकोला(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्व तालुका आणि गाव पातळीपर्यंत राज्य मराठी पत्रकार संघ कार्यरत असुन संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शासनाकडून पत्रकारांना अधिक सवलती मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली. पत्रकारही समाजातील प्रमुख घटक असल्याने कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने या घटकालाही मदत करावी अशी मागणीही बैठकीत पुढे आली.
अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांची वेब बैठक मंगळवार दि. 7 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी घेतली. यावेळी विदर्भ विभागीय उपाध्यक्ष संदीप पांडव, अमरावती विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ तायडे, अमरावती जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुशे, अकोला महानगर अध्यक्ष अमित कंधहार(देशमुख) यांच्यासह इतर पदाधिकारी व पत्रकार सहभागी झाले होते. सिद्धार्थ तायडे यांनी अमरावतीमधील कोरोनाची परिस्थिती आणि वृत्तपत्र माध्यमांसमोरील निर्माण झालेल्या अडचणी व संघटन पातळीवरील समस्या मांडल्या. इतर पदाधिकार्यांनीही कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे जाहीरातीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला असुन पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासन स्तरावरुन मदत होण्याचे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर अनेक ठिकाणी कोरोनाच्या काळात संघटनेच्या माध्यमातून अडचणीतील लोकांना मदतही करण्यात आल्याच्या उपक्रमाचे प्रदेशाध्यक्षांनी कौतुक केले. यावेळी बोलतांना वसंत मुंडे म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष बैठका घेणे अशक्य असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेब संवाद साधला जात आहे. महाराष्ट्रात राज्य मराठी पत्रकार संघ सर्व जिल्हे, शहर, तालुके आणि गाव पातळीपर्यंत कार्यरत आहे. लिहिते आणि सक्षम पत्रकारांमुळे संघटनेची विश्वासार्हता निर्माण झाली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रसंगी संघर्ष करण्यासाठी राज्य पत्रकार संघ तत्पर असतो. कोरोनाच्या काळात पत्रकारांनी स्वतःची काळजी घेत सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या या माध्यम क्षेत्राला सरकारने व समाजानेही मदतीचा हात द्यावा यासाठी राज्य पत्रकार संघ प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली. यावेळी अकोला जिल्हा संघटक स्वाती सुरजुशे, दीपक गवई, बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष प्रदीप गावंडे, बाळापूर तालुकाध्यक्ष पवन वानखेडे, उपाध्यक्ष झाकीर अहमद, अमोल कर्हे, सुरेश घ्यारे यांच्यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी सहभागी झाले होते. पहिल्यांदाच नवीन तंत्रावर पत्रकारांशी संवाद करत उपयुक्त मार्गदर्शन करुन कोरोनाच्या काळातही पुन्हा उभारी घेण्याचा आत्मविश्वास प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांमध्ये निर्माण केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.